Tadya...

English

तड्या .. मित्रा... तुला व्हॉटस्अप किंवा फेसबुकवर... RIP अशा उथळ प्रतिक्रियांसाठी न्युज करायचे नव्हते म्हणून माझ्या वैयक्तिक ब्लॉगवर ही पोस्ट तूला समर्पित करत आहे...

 

"मन्या शेट! सगळं कमवलं बघ... पैका... नांव... पत... आता बस्स... पुण्यात जाऊन स्थायीक होईन, मूलांच्या शिक्षणाकडे लक्ष देईन, जमतील तेवढ्या केसेस फक्त स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी हाताळेन आणि बस्स.... लाईफ एन्जॉय करेन... चल भेटू लवकरच... आई साठी निघायची घाई आहे रे मित्रा... काय करु.. मलाच करावं लागतं तिचं सगळं... दादीजींना, काकुंना आणि काकांना नमस्कार सांगशील... पुढच्या वेळी नांदेडला आलो म्हणजे नक्की भेटेन त्यांना... अरे तो आरडीसी आहे ना सध्या नांदेडचा तो रे माझा मावस भाऊ आहे अन् तो सिविल कोर्टातला न्यायाधिश... तो आत्याच्या मिस्टरांचा पुतण्या आहे... काम पडतंच रे माझं.. मी येईन परत नक्की... मात्र आजची गेट टु गेदर स्मरणात राहिल अशी आयोजित केलीस बेट्या... मारवाडी बच्चा.. लेकाचा अफलातून काम करु शकतोस रे... चल बाय...."

या तड्या अर्थात तडवलकरच्या घाई गडबडीत घेतलेल्या निरोप प्रकरणामुळे, एकंदरीत गेट टु गेदर च्या कार्यक्रमाचे स्वरुपच आटोपते झाले होते ह्याची थोडी निराशा, थोडा राग बऱ्यांच जणांच्या मनात आला होता. तो नंतर बऱ्याच जणांनी माझ्याकडे वैयक्तिकरित्या व्यक्त ही केला.

पण तडवलकर ह्या सगळ्या राग-लोभाच्या पलिकडून एक स्मित हास्य देत गाडीत बसून रवाना पण झाला होता.....

अॅड भालचंद्र तडवलकर असे नांव असलेला हा एमबीए चा मित्र सन 1889 साली जेव्हां माझ्यासह एमबीए च्या प्रथम वर्षात प्रवेश  घेत होता तेव्हा पासून काल परवा पर्यंत तो माझ्यासाठी एक गूढ व्यक्तिमत्व होता. मी स्वतःला जरी त्याच्या जवळचा मित्र समजत असलो तरी, अनेक वेळा त्याने त्याच्या मनांतल्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या असलेल्या असूनही तो माझ्यासाठी एक गूढ व्यक्तिमत्वच होता हे नक्की...

त्याचे वडील लातूरमधे वकिली करायचे. कै. विलासरावजी देशमुख व तत्सम मंडळीचे ते भरवश्याचे वकिल होते. सिविल केसेस मधे ते लातूरच्या अगदी वरिष्ठ वकिलांच्या पंक्तितील एक विद्वान अन् कर्तबगार वकिल होते हे तडवलकरच्या नेहमीच्या बोलण्यातून मला जाणवले होते. अशा कर्तबगार वडीलांचा हा मुलगा, आपल्यासोबत  शिकणार ह्याचा मलाही खरंच आनंद झाला होता. ज्यादिवशी त्याला भेटलो त्यादिवशी तो आणि मी दोघंही बोलत बोलत महाविर चौकापर्यंत पायी आलो होतो. अहो जाहो नं सुरु झालेली ही मैत्री दुसऱ्या सेमिस्टर पर्यंत येता येता अरे तुरे पर्यंत पोंहचली होती. या दरम्यान विजय घिनमिने, विकास गणोरे , दयानंद हाके, मामुलवार आणि मी एक ग्रुप करुन अभ्यास करायचो मात्र त्या ग्रुपमधे ही मी अन् तड्याची जोडी वेगळी असायची, त्याच्या मनांतल्या शंका, त्याचे प्रश्न तो माझ्याकडे वैयक्तिकरित्याच व्यक्त करायचा...

एमबीए झाल्यावर एका टेक्सटाईल्स कंपनी करीता काम करत असतांना त्याला त्याने एका अमेरीकन कंपनीसाठी बहारीनला जाण्याचा योग आला मात्र पासपोर्ट चे काम ना झाल्यामुळे परदेश दौैऱ्याचा तो प्रयत्न फोल ठरला.  त्यानंतर त्याने कंपनी सेक्रेटरीशिपसाठी प्रयत्न केला मात्र 12 मार्कानी तो कंपनी सेक्रेटरीशिप मिळवता मिळवता राहिला. योग्य ते मार्गदर्शन व थोड्याफार योग्य त्या कौशल्याअभावी एमबीए च्या ज्ञानाचा उपयोग करु शकलो नाही याची खंत त्याला नेहमीच असायची. सीएस देखील हातातुन निसटल्यासारखे झाले असल्यामुळे त्याने एलएलबीला अॅडमिशन घेतले आणि वडीलांचे दफ्तर व तेव्हाच्या डिस्ट्रीक्ट जज भावाच्या देखरेखीखाली त्याचा कायदेविषयक अभ्यास सुरु झाला. आणि तडवलकर अॅडव्होकेट झाला. कामाचे स्वरुप त्याने आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं इतके वाढवले की मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांचे कांही शासकिय विभागांचे ड्राफ्टिंग चे काम त्याच्याकडे यायला लागले.

कमालीचा शिस्तीनं वागायचा तो. कधी कधी तर असे वाटायचे की हा किती शिष्ट वागतोय म्हणून. मग हळू हळू कळायला लागले की त्याच्या शिस्तीनं वागण्यामधे त्याच्या त्या सवयींच्या मागे त्याच्यावर झालेले घरातले संस्कार होते. आई आणि बाबांविषयी बोलतांना तो अगदी समरसतेनं बोलायचा. त्याच्या लातूरच्या पोचम्मा गल्लीतील घरी मी जितक्यांदा गेलो तितक्यांदा त्याने आईची भेट घालून दिली. काकूंच्या हातचे अत्यंत स्वादिष्ट पोहे कधीही चुकू दिले नाहित. पोहे खाल्ले की मग आम्ही त्याच्या घराच्या माडीवर जायचो आणि तिथं मग त्याच्या बालपणीचे फोटो, मोठ्या भावांच्या गप्पा, फोटोग्राफी या विषयावर, वडिलांच्या केसेसवर, त्याने सांभाळायला सुरु केलेल्या केसेसवर तो उत्साहाने बोलायचा. क्वचित प्रसंगी मारवाडी शब्दांचा उपयोग करुन चिमटे ही काढायचा मात्र सदा स्मित किंवा मनमोकळेपणानंच तो माझ्याशी वागायचा.

त्याच्या लग्नाच्या वेळी मी कमीत कमी दोन दिवस आधी यावे असा त्याचा आग्रह होता मात्र माझ्या व्यस्त कार्यातून मला वेळ काढून त्याच्या लग्नाच्या वेळी अगदी अर्धा तास आधी पोंहचता आले म्हणुन जवळपास सहा महिने आमचा पत्र व्यवहार बंद होता. म्हणजे मी पत्र टाकायचो पण त्याचे उत्तर यायचे नाही. हो, पत्रावरुन आठवले की आम्हांला तेव्हा पोस्टकार्डानं संपर्कात रहाण्याची सवय होती. वर्षातल्या जवळपास प्रत्येक लहान मोठ्या सणावाराला एक 15 पैशांचं पोस्ट कार्ड आम्हांला आणि आमच्या अनुभवांना, आमच्या भावनांना जोडायचं. मग एकदा मीच मुद्दाम तड्याला भेटायला लातूरला गेलो. घरी गेल्यावर आधी 10-15 मिनीटं तो फारच जुजबी बोलला, एकदा तर मला रागच आला त्याचा की मी इथं कशाला आलोय असे वाटत होते की निघून यावे तिथून. मग मात्र पोहे आले, आणि वातावरण जराशे नरम झाले. त्याच्या घराच्या त्या ओसरीवर बसुन पोहे खात, जुन्या नाटांकडे बघून तो बोलला.. मन्या शेट.. तुमची पत्रं मिळालीत हो आम्हांला, पण प्रत्येक पत्रं वाचून वाटायचे की आणखी थोडा भाव खावा आम्ही. तुमची मधाळ भाषा, तुमचं लिखाण काळीज चिरायचं हो, पण आमची अबोली जर तुम्हांला इतकं छान व्यक्त करु देते तर मग आम्ही का लिहावं सॉरी शेट, पण तुम्ही नको यायला हवं होतं... पण साले तुमच्या मारवाडी होण्यावर आम्हांला शंका येतीय बघा, का तर.. पोस्ट कार्डचे 15 पैशे वाचवण्याकरीता तुम्ही नांदेडहून थेट लातूर ला 100 रुपये खर्चून आलात... .. जाऊ द्या चला सोडा.. घ्या पोहे घ्या.. आलात अशावेळी की मंडळीसुध्दा नाहित घरी... आणि सगळी अबोली बाजूला सारुन दोघंही त्याच्या नव्या संसाराच्या चर्चेत रमलो....

वर्षं सरत गेली... मैत्रीचा रंग गहरा झाला पण संपर्क कमी झाल्यामुळे त्यातला ओलावा थोडा कमी झाला... त्यात नंतर भर पडली मोबाईल ची.. कधी मोबाईलवरुन संपर्क करावा म्हटलं तर हा बेटा एक तर कोर्टात असायचा किंवा मग अशिलासोबत व्यस्त असायचा. कै. विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असतांना मात्र त्याने अनेकांना मदत केली, साहेबांच्या दफ्तरी अनेकांसाठी शब्द वापरुन त्याने विविध लोकांच्या समस्यांसाठी आपले ज्ञान वापरले.

स्वतःच्या कामाशी काम, कर्माशी ईमान अन् परिवाराशी एकनिष्ठता राखत तो नेहमीच अलिप्त रहायचा. माझ्या लहान्या वंधूच्या लग्नात आलाच मुळी दहा मिनीटांसाठी. त्यानंतर ही बऱ्याचदा नांदेडी कार घेउन यायचा, कोण डेप्युटी कलेक्टर, कोण जज, कोण तहसिलदार आदी नातेवाईकांना भेटण्यासाठी यायचा, अगदी उभ्या उभ्या दोन-चार मिनीटं बोलायचा आणि आईकडे लक्ष लागलंय, तिची सेवा करायचीय म्हणून निघून जायचा.

शासकिय सेवेच्या त्याच्या आकर्षणाला सिमा नव्हती. कित्येकदा तो हे बोलूनही दाखवायचा की तिर्थरूपांचे कार्य अंगावर घ्यायचे नसते तर मी नक्कीच अधिकारी होणे पसंत केले असते. बऱ्याचवेळा आपल्या एमबीएच्या इतर मित्रांविषयी तो माझ्याकडे उघड नाराजी व्यक्त करायचा. मात्र त्याचा हा स्वभाव, त्याची शिस्त, त्याला कुठेतरी एकटेपणाकडे न्यायला लागली होती की काय अशी मला नेहमीच भिती वाटायची.

2011 साली वडिलांच्या निधनानंतर त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. त्याचा व्यापही भरपूर वाढला होता. कदाचित त्यामुळेच आमचा संपर्क ही थोडासा मंदावला होता. अधून मधून लिहल्या जाणाऱ्या पोस्टकार्डची जागा आता एसएमएस ने घेतली होती मात्र त्यात बऱ्याचवेळा उसणे शब्द, उसणी वाक्य असल्यामुळे त्यातुन आमच्यातला खरा संवाद मागे पडायला लागला होता. एकदा नांदेडी आला तेव्हां म्हणाला होता, मन्या बघता बघता चाळीशी पार झाली की बेट्या.. तुझे छोकरे बघीतले की किती मस्त वाटतं रे... माझी मुलं केव्हां मोठी होतील.. कशी मोठी होतील... पण एक सांगतो बघ... आई वडिलांच्या सेवे सारखा दुसरा आनंद या जगात कुठे नाही रे...

या दरम्यान पून्हा तीन एक वर्ष गेली 2014 च्या जुलै महिन्यांत एमबीए च्या 1990 च्या बॅचचा गेट टु गेदर घेण्याचा आमचा संकल्प झाल्यावर त्याला ही सूचना देण्यासाठी फोन लावला व त्याची वैयक्तिक माहिती माझ्याकडे असूनही जेव्हा वहिनी, मुलांची माहिती, म्हणजे जन्मदिनांक, लग्नाची तारीख वगैरे विचारली तर त्याने अस्सल वकिली भाषेत तुम्हां कंम्प्युटर वाल्यांचा कांही नेम नाही माझ्याकडून ही सगळी माहिती घेउन माझे बॅंक अकाऊंट हॅक करताल त्यामुळे त्या तारखा देत नाही असा शेरा मारला व ती माहिती देण्यास त्याने चक्क नकार दिला.

गेट टू गेदर च्या कार्यक्रमातही तो जरा तुटक तुटकच वागल्यासारखा, तटस्थ, जास्त सरमिसळ न होता, पूर्वीपेक्षाही थोडासा जास्तच शिष्ट वागला होता. विशेष करुन जेव्हां त्याला स्टेजवर बोलावून त्याची मुलाखात घेण्यात आली तेव्हां देखील त्याचं वागणं-बोलणं दोन्ही खूपच रेस्ट्रीक्टेड...राखून राखून असल्यासारखे वाटत होते आणि त्यानंच शेवटी गेट टु गेदर चा समारोप लवकर करण्याची घाई केल्यामुळे आधी उल्लेखलेल्या प्रमाणे बरीच जणं त्याच्यावर रागावली होती.

गेट टु गेदर नंतर ही व्हॉटस्अप च्या ग्रुपवर त्याला ओढून ताणून, गोंजारुन, समजावून अॅक्टीव्ह ठेवण्याचे कार्य दोन एक सदस्यांमुळे जमुल आले होते. 2016 सालच्या मार्च महिन्यात त्याने मुलांच्या मुंजीचे निमंत्रण अगदी आग्रहाने सगळ्यांना दिले होते व पुन्हा एकदा गेट टु गेदर लातूरला करुया असे आवाहन ही केले होते. सदरील कार्यक्रमाला आम्ही तिघं मित्र आवर्जून गेलो होतो. मुंजीच्या कार्यक्रमाची अत्यंत सुंदर बडदास्त त्याने केली होती. प्रत्येक कार्यात त्याच्या शिस्तीची आणि बारीकीनं आखलेल्या नियोजनाची झलक दिसत होती. तिथं आम्ही त्याला आईला स्वतःच्या हातांनी उचलून गाडीत बसवतांना पाहिलं. नंतर बोलतांना तो म्हणाला ही की आईला पॅरालिसीस झाल्यापासून आईची सगळी सेवा मी स्वतः करत असतो. माझ्या पत्नीलाही आईच्या कोणत्याच कामासाठी मी आग्रह धरीत नाही. कारण ही माझी आई आहे, माझी जन्मदात्री आहे. तिच्या दिमतीला मी जितका तत्पर असेन तितका कुणी असू शकेल का? लोकं जीवनांत दहा ठिकाणी फिरण्याची इच्छा ठेवतात मात्र मी माझी आई जिथं असेल तिथं रहाण्यात आनंद मानणारा व्यक्ती आहे. माझ्या बायकोच्या माझ्या जीवनावर खुप मोठा प्रभाव आहे. ती एम ए सोशियोलॉजी झालेली आहे आणि माझ्या प्रत्येक भूमिकेमधे तिची भूमिका खूपच महत्वाची असते रे... पण जिथं आईृ-बाबा आले तिथं माझी भूमिकाच महत्वाची असते असे मला वाटते रे...

मुंजीच्या कार्यक्रमांतुन निघतांना तो म्हणाला होता की एकदा निवांत भेटा शेट, मग बोलू या आपण, कारण लवकरच मी पुण्याला स्थायिक होण्यास जाणारेय... त्याआधी जरा लातूरचं मन लातूरलाच मोकळं करुन टाकू....

गत सहा सात महिन्यांपासून तो व्हॉटस् अप ग्रुपवर असून नसल्यासारखाच होता... पूर्वी देखील आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्याला दोन एक सदस्य कायम प्रेरीत करायला लागायचे तेव्हां कुठे तो कांही तरी पोस्ट अधून मधून टाकायचा... त्यामुळे त्याच्या गैरहजरीचे कुणी एवढे मनावर ही घेतले नव्हते. मात्र 6-7 महिन्यांपासून त्यानं दिलेला फोन नंबर ही बंदच येत होता म्हणून 5 फेब्रुवारी 2017 ला मी मुद्दाम लातूरला गेलो... पोचम्मा गल्लीत त्याच्या घराजवळ गेलो आणि त्याचा जुना एक मित्र बाहेरच भेटला आणि तिथं त्यानं वकिलसाहेब गेले म्हणून सांगीतले. दोन मिनीटं मी गोंधळलो.. मला वाटले की तो बहुधा काकांविषयी बोलतोय किंवा तड्या पुण्याला गेलाय म्हणून सांगतोय.. पण त्याने तपशिलवारीनं जेव्हां सांगीतले की....

साधारणतः जुन महिन्यांत त्यानं पुण्यात जाऊन स्थायिक होण्याच्या अनुषंगानं तयारी ही सुरु केली होती. ऑगस्टच्या दूसऱ्या आठवड्यांत पोचम्मा गल्लीतील आपल्या दोन एक जुन्या मित्रांना त्याने पुण्याला जाणार असल्याची खबर देऊन दुसऱ्या दिवशी घरी भेटायला सुध्दा बोलावले होते.... आणि रात्री... ब्रेन हॅमरेज ने त्याने सगळ्यांचीच साथ सोडली... लातूरच्या स्वप्नांना लातूरलाच ठेउन देवाघरी निघाला सुध्दा... 

ही ह्रदयद्रावक घटना ऐकुन माझं सर्वांग जवळपास दहा मिनीटं थरथरत होतं... काय बोलावं हे सुध्दा सूचत नव्हतं... कसा बसा तिथून निघालो अन् नांदेडी परतलो....

5-6 दिवस सुनेपणांत... अन् स्तब्धतेतच गेले... कुणाला सांगावं... काय सांगावं... कसं सांगावं... एका मित्राच्या अचानक झालेल्या ह्या एक्झीटच्या बातमीला कसे शेअर करावे  करावे का ना करावे या विवंचनेत 15-16 दिवस निघून गेले परवाच शिवरात्रीच्या दिवशी अंजली रत्नपारखी यांचा फोन आला आणि तिला मी ही बातमी सांगीतली व या बातमीचा व्हॉटस् अप वर एक अपडेट वा फ्लॅश न होऊ देता... किंवा रिप ची बातमी होऊ देऊ नकोस अशी विनंती सुध्दा केली...

कारण मला भरपूर मित्र असले तरी, तड्यालाही भरपूर व्यावसायिक मित्र असले तरी त्याच्या भावना समजून घेणारा, त्याच्या डोळ्यातील भाव टिपणारा व तड्या , समथिंग इज गोईंगं रॉंग यार म्हणणारा मात्र मी एकटाच होतो असे मला नेहमीच वाटयचे अन् आजन्म वाटत राहिल... 

त्याच्या एक्झीट नंतर वहिनी माहेरी रहायला गेल्यात.... मुलं दोन्ही पुण्यात शिकतात... काका मंडळी त्यांची काळजी घेत लक्ष ठेउन आहेत हे त्याच्या बंधूंकडुन कळालं... तरी ही वहिनींना व त्याच्या मुलांना एकदा भेटण्याची तिव्र इच्छा मनांत झालीय पण आज तरी हिम्मत होत नाहिय. त्याच्या एक्झीट पेक्षा ही जास्त दुःख त्याच्या अव्यक्त एक्झीटचे झालेय. एक वकिल म्हणून तो जितका अलिप्त, तटस्थ आणि शिस्तीचं आयुष्य जगला त्यापेक्षा ही तो एक मित्र म्हणुन जास्त स्मरणात राहण्यासारखा आहे.....

गत 10-12 दिवसांपासून ऋतु बदलाचे वारे वाहत आहे... ग्रिष्म सुरु होणारेय .... किंबहुना उंबरठ्यावर उभा आहे..... तसाच तड्या अन् माझ्या मैत्रीला आता कायमचा ग्रिष्म लागलाय... 

निसर्गाच्या ऋतुचक्राला ग्रिष्मानंतरच्या वर्षा ऋतुची कायम प्रतिक्षा असतेच पण तड्याच्या मैत्रीच्या या ग्रिष्मला इधून पुढे अंत नाही....
रखरखत्या वाळवंटातही तुसभर का होईना हिरवंपण देउन उभा राहतो तसा तड्याच्या आठवणींचा निवडूंग बनुन आम्ही उभे राहू... सदैव त्याच्या आठवणीत....

पुन्हा मानवी देह मिळालाच....
तर निश्चितच पून्हा एकदा तुझा मित्र व्हायला आवडेल असं वारंवार म्हणावसं वाटतंय...
 नव्हे मी म्हणतोय मित्रा...
 तू .............  ऐकतोयस् ना......?       तड्या...!

मनोज गोविंद पुरोहित
नांदेड
दि. 27/2/2017

Follow us on:

 
 
 
Back to Top