अभिक्षमता चाचणी… एप्टीट्यूड टेस्ट, विद्यार्थ्यांची खरी मार्गदर्शिका…!

बोर्डाच्या किंवा सीबीएससी च्या मुलांच्या परीक्षा जवळपास संपल्या आहेत व आता जेव्हा ही मुलं, विशेष करून इयत्ता दहावीची मुलं, जेव्हा त्यांच्या जीवनाच्या पहिल्या महत्त्वाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभी आहेत, अशावेळी करियर कौन्सिलची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असते.
हे होऊ शकते की, करिअर कौन्सिलरची भूमिका पालक स्वतः सुद्धा निभावू शकतात मात्र बऱ्याच वेळा पालकांचा विचार एकांगी असतो,

आपल्या मुलांनी कोणत्या क्षेत्रात त्याचे शिक्षण पूर्ण करावे? ह्याचा निर्णय घेण्याची खरतर हीच मुख्य वेळ. कारण एकदा का अकरावीला ऍडमिशन घेतली, की त्यानंतर एखादा विद्यार्थी, जे काही क्षेत्र निवडतो त्या क्षेत्रातून त्याला पुढचे प्रशिक्षण करणे क्रमप्राप्त होते. म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी, आत्ताच, अटीट्युड टेस्ट करून घेऊनच आपल्या पाल्याच्या अंगीभूत असलेल्या कलागुणांना सोबत त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या क्षमता, त्यांच्या उणिवा, यांचे योग्य ते मूल्यमापन करून, आपल्या पाल्याने नेमकं कुठल्या क्षेत्रात करिअर करावं? याचं मार्गदर्शन करिअर कौन्सिलर करत असतात.

कुठल्या क्षेत्रात करिअर करावं हा निर्णय खरं तर अत्यंत जागरूकपणे, समंजसपणे आणि विचारपूर्वक घ्यावयाचा असतो. मात्र आपल्याकडे विद्यार्थी आपल्या करिअरला एक तर पालकांच्या सांगण्यावरून किंवा मित्रांच्या आग्रहावरून किंवा कोणाला तरी पाहून प्रेरित होऊन निवडत असतो. त्यामुळे जेव्हा आमच्याकडे विद्यार्थी आणि पालक येतात तेव्हा आम्ही त्यांना सांगत असतो की करिअरची निवड हा सुद्धा आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रक्रियेचा एक भाग आहे. करिअरची निवड आपल्यासमोर उपलब्ध असलेल्या पर्यायांवर अवलंबून नसून, आपल्या अंगभूत असलेल्या गुणांवर आधारलेला असतो. 

अटीट्युड टेस्ट मध्ये नेमके काय असते?

एप्टीट्यूड टेस्ट मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी दिले जातात. याद्वारे खालील गोष्टींबाबत त्या विद्यार्थ्यांची तयारी स्पष्ट होत असते. उदाहरणार्थ-

1. तर्कविचार क्षमताः- नवीन विषय अथवा संकल्पना यांची माहीती मिळाल्यावर, त्याचे विश्लेषण करून, त्यावर निष्कर्ष काढण्याच्या क्षमतेला तर्क विचार करत असे म्हणतात.

2. भाषिक क्षमताः- बरेच विद्यार्थी हुशार असतात पण परीक्षेमध्ये उत्तर लिहित असतांना त्याला नेमके काय म्हणायचे आहे? हे तो नेमक्या शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशा वेळी त्याची भाषिक क्षमता कमकुवत आहे असे समजल्या जाते.

3,4. अभाषिक क्षमता आणि अभाषिक स्मृतीः- बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीकडे शैक्षणिक पात्रता खूप जुजबी असते, मात्र त्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नसलं तरी केवळ निरीक्षणातून शिकण्याची किंवा निरीक्षणातून कार्य करण्याची कुशलता त्याच्या अंगी असते ह्यालाच अभाषिक क्षमता आणि स्मृती असे म्हणतात.

5. व्यावहारिक दृष्टीः- एखाद्या प्रसंगाकडे किंवा घटनेकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन कसा आहे? हे सुध्दा बारकाईने बघितले जाते .

6. सर्वसामान्य आकलनक्षमताः-  विद्यार्थ्यांची नवीन विषय, नविन संकल्पना आणि नवीन गोष्टी यांना समजून घेण्याची क्षमता याद्वारे गणली जाते. आकलनक्षमतेचा आणि तर्कविचार क्षमतेचा उपयोग बहुतांश क्षेत्रांत जास्त प्रमाणांत होत असतो.

7. अवकाश बोधन क्षमताः- या क्षमतेमधून द्विमिती आणि त्रिमिती समजून घेण्याची क्षमता,  2डी-3डी आकृती चित्रांना समजून घेणे, आकार-डिझाईन समजून घेणे, त्यांची कल्पना करणे, त्यांची आकृती काढता येणे, त्याचा अंदाज बांधणे ह्या विविध क्षमतांची जाण आपण करुन घेत असतो.

8. कलात्मक दृष्टीकोनः-  ह्यामधून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलात्मक अंगांचे निरीक्षण केले जाते. विविध प्रकारच्या कला क्षेत्रांत विशेष करुन आर्किटेक्चर, इंटेरियर डिझाईनिंग, लॅंडस्केप डिझाईनिंग, फाईन आर्टस्, प्रॉडक्ट डिझाईनिंग, फॅशन डिझाईनिंग आदी क्षेत्रांत जाण्यासाठी ही क्षमता खुपच महत्वाची ठरत असते. 

9. सामाजिक क्षमताः- एखाद्या सामाजिक प्रश्नांविषयी, विद्यार्थी किती जागरूक आहे? व तो आपल्या शेजाऱ्यांसह, आपल्या नातेवाईकांसह, आपल्या भावंडांसह कसा वागतो? किंवा त्याचा ह्या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे? ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक क्षमतांमध्ये मोडतात.

10. तात्विक वैचारिक कलः- एखाद्या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना करून दिल्यावर त्याचा उपयोग कसा करायचा? कुठे करायचा? ह्याची क्षमता म्हणजे तात्विक वैचारिक कल असे म्हणू आपण. विशेषकरून, पदवी-पदव्युत्तर शिक्षणामध्ये याचा खूप उपयोग होत असतो.

11. महत्वाकांक्षाः-  अनेकदा असे दिसून येते की वरील पैकी कांही क्षमता कमी असूनही, एखादा विद्यार्थी पुढे, अभ्यासामध्ये अपेक्षेच्या पलिकडे यश मिळवतात. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या अंगी असलेली जिद्द अथवा महत्वाकांक्षा. या दोघांच्या जोरावर ही मुलं आश्चर्यकारक किमया साधू शकतात, 

12. अंक स्मृतीः-  दिलेले अंक लक्षात ठेवून, त्यांना पुन्हा आठवण्याची क्षमता म्हणजे अंक स्मृती. अनेक क्षेत्रांमध्ये सतत अंकांसोबत कार्य करावे लागते, अशा वेळी नुकतेच वाचलेले अंक अथवा केलेले गणित ह्या बाबतीत अंक स्मृती चांगली असणं गरजेचे  असते.

13. अंकज्ञानः-  अंकांविषयीचे ज्ञान आणि त्याचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे अंकज्ञान.

या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या जवळपास 16 प्रकारच्या उपचाचणी परिक्षा एका मुख्य टेस्ट मध्ये समाविष्ट असतात. 

वरिल प्रकारे, एका एप्टीट्यूड टेस्ट वरून विद्यार्थ्यांच्या क्षमता व कल मोजले जातात त्यामधून त्यांच्यातील सामर्थ्य म्हणजेच बलस्थाने कमतरता म्हणजे व्यक्तिमत्वाच्या कमकुवत बाजू ह्यांचा अभ्यास होतो. ह्या सगळ्या क्षमता आणि साहजिक कल ह्यांच्या अभ्यासातून मग त्या विद्यार्थ्यासाठी कोणते क्षेत्र योग्य राहिल हे सुध्दा विद्यार्थी व पालकांसोबतच्या बैठकीतून ठरविण्यात येते. प्रत्येक क्षेत्रासाठी काही क्षमता आणि काही कल कमी-अधिक प्रमाणात महत्त्वाचे असतात. एखाद्या क्षेत्रासाठी लागणाऱ्या क्षमता आणि कल पुरेसे नसतील तर ते निरंतर प्रयत्नांनी विकसित करता येतात किंवा वाढविता येतात मात्र त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो व त्यादृष्टीने जागरूक राहून निरंतर प्रयत्न करावे लागतात. ह्या करिता समुपदेशक चांगल्या प्रकारे आपली मदत करू शकतील. एप्टीट्यूड टेस्ट च्या अहवालावरून विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत कोणते क्षेत्र योग्य आहे हे सांगता येऊ शकते तसेच एखादे क्षेत्र निवडताना त्या क्षेत्रासाठी लागणाऱ्या क्षमता पैकी कोणत्या क्षमता कमी आहेत किंवा एखादे ध्येय असल्यास ते तुम्ही गाठू शकणार का? अथवा ते ध्येय गाठण्या मध्ये तुम्हाला अडचणी येतील, हेसुद्धा चर्चेअंती स्पष्ट होऊ शकते. 

अटीट्युड टेस्ट च्या आलेल्या अहवाला बरोबरच, आपल्या पाल्याला मिळणारे मार्क, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांनी आत्तापर्यंत अभ्यास व अभ्यासाव्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये मिळवलेले प्रावीण्य आदी गोष्टींचा एकत्रितपणे विचार करून करिअर मार्गदर्शक तुम्हांला योग्य दिशा मिळवून देण्यासाठी मदत करतात.
एप्टीट्यूड टेस्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेली कुंडलीच समजावी. साधारणतः तीन ते चार तास चालणाऱ्या या टेस्टसाठी कसल्याही प्रकारची पूर्वतयारी गरजेची नसून वर उल्लेखलेल्या क्षमता मधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं सहजसुलभ ठरतं. 

पुढच्या आठवड्यांत आपण विविध क्षेत्रांसाठी कोणत्या क्षमता गरजेच्या आहेत व दहावीनंतर कोणकोणती वेगवेगळी क्षेत्रं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत ह्याविषयी आपण माहिती पाहू.

आपले प्रश्न किंवा शंका असल्यास अथवा एप्टीट्यूड टेस्ट देण्याची इच्छा झाल्यास माझ्याशी संपर्क करावा.

मनोज पुरोहित 
8308502590
9422170112
Contact Us – Great Achievers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *